✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दिनांक 21 डिसेंबर) दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगलीच्या वतीने शनिवार दिनांक 28 व रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी दोन दिवसीय दुसरे दीपस्तंभ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, सांगली कोल्हापूर रस्त्यावरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले साहित्य नगरीत हे संमेलन पार पडणार आहे.

यात आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रो. डॉ. अनिल काळबांडे यांची निवड दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्रख्यात जागतीक विचारवंत प्रोफेसर डॉ. जगन कराडे यांनी जाहीर केली आहे.

तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा येथे मराठी विभाग प्रमुख तथा जागतिक साहित्यिक , प्रबोधनकार गेय कवी म्हणून परिचित असलेले डॉ . अनिल काळबांडे यांच्या नावावर ‘हुंकार व ‘ करुणेची ओल ‘ हे दोन काव्यसंग्रह असून त्यांच्या हुंकार काव्यसंग्रहाला जागतिक बौद्ध धम्म परिषद किनवट चा ‘सम्राट अशोक साहित्यरत्न पुरस्कार तर नांदेड चा महाकवी वामनदादा कर्डक उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे.

तर करुणेची ओल या काव्यसंग्रहाला अस्मिता दर्शसाहित्य संमेलन वाशिम येथे ‘ उत्कृष्ट काव्य निर्मितीचा पुरस्कार ‘ मिळाला असून त्यांच्या हुंकार काव्यसंग्रहातील ‘हुंकार पाहीला मी भाकरीत जळतांना फनकार पाहीला मी , या कवितेचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश आहे.

ते गेय कवी म्हणून प्रसिद्ध असून आपल्या पहाडी आवाजाने ते सर्व दूर परिचित आहेत . त्यांनी आपल्या कवितेचा प्रवास थायलंड , दुबई ,इंडोनेशिया , मलेशिया भूतान , मॉरीशस , मालादिव , श्रीलंका , नेपाळ , तैवान यासह साहित्य संमेलनाच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचवलेला आहे.

सांगली येथे होणाऱ्या दोन दिवसीय दीपस्तंभ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तथा थायलंड येथील तिसऱ्या विश्व आंबेडकरी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ . श्रीपाल सबनीस असून उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सचिन तासगावकर

तर स्वागतअध्यक्ष म्हणून संजय भंडारे त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून जागतिक आंबेडकरी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार खोब्रागडे राहणार आहेत. या कवी संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत कविचा समावेश आहे.