
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड दि. 26 जानेवारी)येथील गो. सी. गावंडे महाविद्यालयात तहसील कार्यालय, राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S) यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी गावंडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांसोबत मतदार शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव कदम होते तर प्रमुख पाहुणे मनोहर नतिकवार, नायब तहसीलदार, उमरखेड हे होते.

मताधिकाराचा वापर जबाबदारीने केल्याशिवाय लोकशाहीची वाटचाल यशस्वी होणार नाही, असे आवाहन नायब तहसीलदार मनोहर नतिकवार यांनी केले. भविष्यातील जबाबदार नागरिक या नात्याने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आम्हा सर्व तरुणांवर असल्याचे मत यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले व मतदानाचा हक्क बजावण्याचा संकल्प केला.

भारतातील लोकशाही जगातील मजबूत, परिपक्व व बळकट लोकशाहीचे मूर्तिमंत प्रतिक असल्याचे प्रतिपादन प्रास्ताविकामधून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही. एस. इंगळे यांनी केले. महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केली असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा राज्यशास्त्र विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत नोंदणी करून मतदार ओळखपत्र काढावे.

जेणेकरून तुम्हालाही मताधिकार मिळेल व भारतातील लोकशाही विकसित होईल. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम यांनी व्यक्त केले.यावेळी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. ए. पी. मिटके यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. पी. वाय. अनासने यांनी केले. कार्यक्रमास प्रा. ए. पी. मिटके, डॉ. व्ही. आर. जीवतोडे तसेच सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.