
◆आ.किसनराव वानखेडे यांचा कोर्टा आश्रम शाळेत मुक्काम◆आदिवासी मंत्र्यांना व्हिडीओ कॉल द्वारे दाखविली शाळा◆ आ.किसनराव वानखेडे यांनी कोर्टा आश्रम शाळेत घेतला वर्ग..
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमाअंतर्गत उमरखेड विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे हे पैनगंगा अभयारण्यातील कोर्टा वन येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत दि.7 फेब्रुवारी 2025 रोजी मुक्कामी होते.

त्यांनी विद्यार्थी, पालक, तेथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध वेळेत बैठका घेत समस्या जाणून घेतल्या. शालेय परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री आश्रम शाळेतील स्वयंपाक गृह व विद्यार्थ्यांच्या शयनगृहांची पाहणी केली. तसेच रात्री 1 वाजेपर्यंत तेथील कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या.
आगदी साध्या भोजनाचा आस्वाद घेत आमदार वानखेडे यांनी कोणत्याच भौतिक सुविधेचा उपभोग न घेता तेथील शालेय कार्यालयात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दि.8 फेब्रुवारी रोजी प्रातःकाळी योगासनांची कवायत केली. आरोग्य कक्ष, भांडारगृह, स्वयंपाक गृह, मुला-मुलींचे स्वच्छता गृह, शयनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संगणक कक्ष, वर्गखोल्या व कर्मचारी निवासस्थानांची पाहणी केली.

आस्थादायकपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्य, शैक्षणिक व इतर मूलभूत गरजांबद्दल चर्चा करीत त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.कोर्टा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत कार्यरत अल्पसा शिक्षक वृंद व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्या देखील अवगत करून घेतल्या.
आमदारकीचा कुठलाही तामझाम/प्रोटोकॉल न बाळगता आ.किसनराव वानखेडे यांनी तेथील विध्यार्थ्यांसमवेत अल्पोपहार घेत त्यांच्या कौटुंबिक बाबतीत विचारपूस करीत हितगुज साधले.

इयत्ता नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांचा आमदार वानखेडे यांनी मराठी या मातृभाषेस अनुसरून उकार,काना, मात्रा व वाक्यरचना बद्दल विध्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले असता त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी त्यावर यथोचित मार्गदर्शन करीत तब्बल अर्धा तास वर्गावर शिकवणी केली. अगदी साध्या वेशातील, साध्या बोलीभाषेत शिकविणाऱ्या आमदारांनी विध्यार्थ्यांना अल्पवेळातच भुरळ घातली.

“अजून काहीतरी शिकवा ना साहेब.!” म्हणता अशी गळ विद्यार्थ्यांनी घातल्याने आमदार किसनराव वानखेडे व आदिवासी विकास निरीक्षण अधिकारी दत्ता आडे हेही भावूक झाल्याचे उपस्थित पालकांनी माध्यमांना सांगितले.
वर्ग खोल्यांचे इमारत बांधकाम, शौचालये, स्वछता गृहे, अत्याधुनिक स्वयंपाक गृहे व अत्याधुनिक संगणक कक्ष, सर्व सुविधायुक्त शयनगृहांची निर्मिती शासन स्तरावर पाठपुरावा करून आपण लवकरच करणार असल्याचे आश्वासन आ.वानखेडे यांनी तेथील विध्यार्थ्यांना दिले. कोर्टा येथील आश्रम शाळेस अधिकाधिक निधी देऊ- आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके

◆बॉक्स- ‘सवांद चिमुकल्यांशी’ अंतर्गत कोर्टा येथील आश्रम शाळेतून आमदार किसनराव वानखेडे यांनी आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांचेशी व्हिडीओ कॉल द्वारे थेट संवाद साधत तेथील उणिवा दाखविल्या तसेच प्रार्थनेस अगदी शिस्तीत उपस्थित असलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा संवाद घडवून आणला.
यावेळी आदिवासी विकास मंत्री उईके यांनी वर्गखोल्या, मुला-मुलींचे शयनगृह व इतर मागण्यांसाठी प्रस्ताव प्राप्त होताच आपण तातडीने निधी मंजूर करणार असल्याचे आश्वस्त केले.
शेकडो मिलावरून आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवाद घडवून आणल्याबद्दल मंत्री उईके यांनी आमदार वानखेडे यांचे आभार मानले. व्हिडिओ कॉल वरून थेट आदिवासी मंत्र्यांशी संवाद साधता आल्याने विद्यार्थी,पालक व कर्मचारी वृंदासह मुक्कामास असलेले आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी प्रचंड भारावून गेले होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक एस.एम.चांगुणे, पालक अधिकारी तथा आदिवासी विकास निरीक्षक डी. बी. आडे, प्रा.आ.केंद्राचे वैधकीय अधिकारी डॉ. सुनिल दुबे हे प्रामुख्याने उपस्थित होते.