[“बहुजन हिताय बहुजन सुखाय “ह्या ब्रीद वाक्याची पुसद आगार व्यवस्थापका कडून अवहेलना]
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)मो.9823995466
✒️ करण भरणे सर (ढानकी सर्कल प्रतिनिधी)

पुसद :- (दिनांक 03 डिसेंबर) एसटी आगाराची महागाव मार्गे फुलसांगवी कडून ढाणकी चालणारी बससेवा पूर्ववत चालू व्हावी. यासाठी माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाने यापूर्वी आगार प्रमुख यवतमाळ यांच्याकडे तशा आशयाचे निवेदन दिले आहे. परंतु पुसद एसटीडेपो अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे आज पावेतो ही बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यां, प्रवासी, रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.


पुसद ते ढाणकी मार्ग गुंज, महागाव, फुलसांगवी, निंगणूर होत ढाणकी येथे पोहोचणारी बससेवा गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. ही बससेवा सुरळीत चालू असतांना पुसद आगार व्यवस्थापक पांडे यांनी ही सुरळीत चालू असलेली बस सेवा अचानक बंद केली. यामुळे या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण यांना नाक त्रास होत आहे.अतोनात हाल होत आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करून आगार व्यवस्थापकास अवगत केले. यवतमाळ जिल्ह्याला नव्याने आलेले विभाग नियंत्रक कछवे ,विभागीय जिल्हा वाहतूक अधिकारी दरांडे यांनी ही पुसद आगार व्यवस्थापकाला दूरध्वनीद्वारे सूचना केली. मागील मार्चमध्ये बस सेवा पूर्ववत चालू ठेवण्याचे आदेशही देण्यात आले,

त्यांच्या आदेशाला आगार व्यवस्थापक पुसद यांनी केराची टोपली दाखवली. कर्तव्यामध्ये निष्क्रिय असलेल्या अशा आगार व्यवस्थापकावर त्वरित कार्यवाही करत बस सेवा पूर्ववत चालू व्हावी, ग्राहकाची होणारी गैरसोय दूर करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली.

एसटी महामंडळाच्या “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” या ब्रीद वाक्याची चक्क या ठिकाणी अवहेलना होत आहे. पुसद ते सवना, महागाव, फुलसांगवी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैध्य खाजगी ट्रॅव्हल्स धावतात.
मग एसटी महामंडळालाच या मार्गावरून बस फेरी का फायद्याची नाही. आगार व्यवस्थापक वरिष्ठांना ही फेरी फायद्याची नसल्याचे भासवून वरिष्ठांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कदाचित पुसद आगार व्यवस्थापकांचे अवैध प्रवासी वाहतूकदारासोबत लागेबांधे आहेत की काय ? असा संशय व्यक्त होण्यास वाव मिळत आहे. यासंदर्भात कार्यकारी संचालक महाव्यवस्थापक म.रा. प. म. मुंबई यांना निवेदन सादर करण्यात येऊन हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाही यासंदर्भात कळविण्यात आल्याचे शेख इरफान अध्यक्ष, माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.